Monday, 13 January 2014

युजरनेम (Username) आणि पासवर्ड (Password) म्हणजे काय?

युजरनेम (Username) आणि पासवर्ड (Password) म्हणजे काय?
 युजरनेम (Username) आणि पासवर्ड (Password) हे दोन शब्द आपल्याला ई-मेल वापरताना पहायला मिळतात. ज्याप्रमाणे आपला मोबाईल क्रमांक फक्त आपल्यानावावर नोंदविलेला असतो, म्हणूनच आपल्या मोबाईलवर केलेला फोन फक्त आपल्याच मोबाईलवरच येतो. त्याचप्रमाणे ई-मेल बनविताना युजरनेम (म्हणजेच वापरणाऱ्याचे नाव) देणे आवश्यक असते. जेणेकरुन तो ई-मेल पत्ता फक्त आपल्याच नावावर नोंदविला जाईल.
ई-मेल जगभरामध्ये वापरला जातो म्हणजेच एखाद्या नावाचा ई-मेल जगभरामध्ये फक्त एकाला दिला जातो. म्हणजे जसे आम्ही osiloha@gmail.com  हा ई-मेल बनविला आहे. याचाच अर्थ जगभरामध्ये हा ई-मेल पत्ता दुसर्‍या कुणालाच मिळणार नाही.
osiloha@gmail.com या ई-मेलमध्ये सुरुवातीला असलेले osiloha हे नाव या ई-मेलचे युजरनेम (Username) आहे, म्हणजेच वापराणाऱ्याचे नाव तर शेवटी असलेल्या gmail.com  द्वारे आपला ई-मेल आपण कुठल्या वेबसाइटवरुन घेतला आहे हे कळते. जसे इथे शेवटी gmail.com असे आहे. म्हणजे हा ई-मेल जीमेल वेबसाइटवर बनविलेला आहे, यालाच होस्ट (Host) असे म्हणतात. युजरनेम आणि होस्ट या दोन गोष्टींना  @   या चिन्हाद्वारे विभागले जाते.
इथे osiloha हे युजरनेम जरी gmail.com  वर ई-मेल बनविण्यासाठी वापरले असते तरी ई-मेल सेवा देणार्‍या इतर वेबसाइटवर हेच युजरनेम वापरुन ई-मेल बनविणे शक्य आहे.
आपला ई-मेल सुरक्षित रहावा तसेच आपल्याला आलेले ई-मेल फक्त आपल्यालाच पाहाता यावेत यासाठी ई-मेल खाते त्या ई-मेलसेवा देणाऱ्या वेबसाइटवर पासवर्डद्वारे सुरक्षित केलेले असते. ज्याप्रमाणे आपण घराला कुलूप लावून घर सुरक्षित करतो तसेच नविन ई-मेल बनवितानाच आपल्याला त्याला सुरक्षित करण्यासाठी सुरुवातीलाच पासवर्ड द्यावा लागतो. ई-मेल बनविताना दिलेला पासवर्ड आपण नंतर सुरक्षिततेसाठी कितीही वेळा बदलू शकता.
पासवर्ड हा एक गुप्त शब्द असतो जो सर्वांना दिसू नये म्हणून खास करुन ******* अशा चिन्हांच्या स्वरुपात दाखविला जातो. थोडक्यात पासवर्ड म्हणजे ई-मेलच्या कुलूपाची किल्लीच (चावी) असते. योग्य पासवर्ड दिल्यानंतरच ई-मेल उघडले जाते.

No comments:

Post a Comment