Monday, 13 January 2014

ऑनलाईन जॉब/काम देणारी संकेतस्थळे

ऑनलाईन जॉब/काम देणारी संकेतस्थळे
 सध्या १०० पैकी ९५ कंपन्या ऑनलाईन जॉबद्वारे फसविण्याचे काम करीत आहेत. लोकांचा वापर करुन उलट त्यांच्याकडूनच पैसे उकळायचे असा त्यांचा धंदा असतो.
आपण घरबसल्या इंटरनेटद्वारे ऑनलाईन काम करुन पैसे कमवा तसेच जाहिरातींवर क्लिक करुन महिना हजारो कमवा अशा जाहिराती जर आपण पाहिल्या असतील. फुल टाईम अथवा पार्ट टाईम काम करुन आपल्या घरी काम करुन पैसे कमवा असे सांगणार्‍या या जाहिराती असतात. इंटरनेटवर दिवसातून काही तास काम करुन आपण काम केल्यास महिन्याला हजारो रुपये मिळू शकतात असे या कंपन्यांचे म्हणणे असते. तसेच दिवसामध्ये कधीही आणि ऑफिस, घरी अथवा सायबरकॅफे असे कुठूनही आपण काम करु शकता. अशी जर जाहिरात आपण पाहिली असल्यास अथवा असा एखादा ई-मेल आपल्याला आला असल्यास सावध रहा कारण पैसे मिळवून देण्या एवजी पैसे लुटण्याचेच काम या कंपन्या करीत असतात.
नोकर्‍यांच्या कमतरतेमूळे अशा कंपन्यांना फसविण्यासाठी बरेच लोक सापडतात.
प्रामुख्याने दोन प्रकारची कामे या कंपन्यांद्वारे देण्यात येतात. १) ऑनलाईन जाहिरातींवर क्लिक करण्याचे काम २) घरी बसून पुस्तके टाईप करण्याचे काम
१)ऑनलाईन म्हणजे इंटरनेटद्वारे आपल्याला या कंपन्यांच्या संकेतस्थळावर आपले खाते उघडायचे असते. या खात्यामध्ये आपले नविन ई-मेल आल्याचा विभाग असतो या ई-मेल मध्ये दररोज नविन ई-मेलद्वारे ते आपल्याला निरनिराळ्या पण सारख्याच दिसणार्‍या जाहिरातींच्याच संकेतस्थळांवरील जाहिरातींवर क्लिक करायला सांगतात. आपल्याला या जाहिरातींवर क्लिक करुन काही सेकंद थांबायचे असते याद्वारे काही पॉईंट्स आपल्या खात्यामध्ये जमा होतात. असे साधारण ९०,००० पॉईंट्स महिन्याभरामध्ये आपल्या खात्यामध्ये जमा झाल्यानंतर त्या कंपनीकडून आपल्याला चेक पाठविला जातो असे ही कंपनी काम करते.  महत्त्वाचे म्हणजे अशाप्रकारे फक्त जाहिरातींच्या संकेतस्थळावरील जाहिरातींवर क्लिक केल्याने त्या कंपनीला काय फायदा होत असावा ही माहिती गुप्त ठेवण्यात येते. आपल्याला फक्त त्या जाहिरातींवर क्लिक करुन पॉईंट्स जमवायचे असतात.
२)कंपन्यांच्या दुसर्‍या प्रकाराच्या कामाला 'डाटा इंट्री'  चे काम देखिल म्हटले जाते. या कामामध्ये आपल्याला एखाद्या कंपनीला आलेल्या लोकांची एकाच प्रकारची माहिती सतत टाईप करायचे काम असते. जसे एखाद्या बँकेची लोकांची खाते माहिती असलेली कागदपत्रे टाईप करायचे काम असते अथवा कंपनीद्वारे आपल्याला पुस्तके देण्यात येतात. आपल्याला या पुस्तकातील माहिती टाईप करुन देण्याचे काम करायचे असते. असे टाईप करुन देण्याच्या कामामध्ये एक देखिल चूक असू नये अशी या कंपनीची अट असते. तसेच जेवढे काम करुन द्याल तेवढे पैसे मिळतील म्हणजे जास्त काम केल्यास भरपूर पैसे मिळण्याची आशा काम करणार्‍याला वाटू लागते.
वरील दोन्ही प्रकारामध्ये लोकांना फसविण्याचे काम मोठ्या प्रमाणात केले जाते. इंटरनेटवरील जाहिरातींमध्ये या कंपन्यांनी त्यांच्या संकेतस्थळांवर अनेकांना त्यांच्या कामाचे चेक दिल्याचे सांगितले असते तसेच निरनिराळ्या लोकांची खोटी नावे दिलेले असतात. कारण महत्त्वाचे म्हणजे तेथे त्यांचा पत्ता दिलेला नसतो, जेणेकरुन आपण त्यांना या कंपनीबद्दलची माहिती विचारु शकतो. प्रत्यक्षात या कंपन्या लोकांच्या क्लिकचा वापर करुन घेत असतात आणि त्या बदल्यात बरेच महिने काम करुन देखिल एक पैसा देखिल दिला जात नाही. शेवटी आपण काम करतोय पण कंपनी काहीच पैसे देत नाही हे पाहून आपण करणे थांबवितो पण तो पर्यंत आपण त्या कंपनीसाठी बरेच काम केलेल असते ते ही मोफत.
तर दुसर्‍या प्रकारामध्ये ज्यामध्ये आपल्याला 'डाटा इंट्री'  चे काम दिले जाते. यामध्ये आपल्याला काम देण्याआधीच आपल्याकडून नाव नोंदणीच्या नावाखाली काही पैसे घेतले जातात. जे आपल्याला नंतर परत मिळतील असे सांगितले जाते पण प्रत्यक्षात ते मिळत नाहीतच. या कामामध्ये आपल्याकडून महिनाभर भरपूर काम करवून घेऊन सुद्धा आपल्या आपल्या कामाच्या मानाने कमी पैसे दिले जातात. इथे पैसे मिळालेले पाहून आपल्याला त्या कंपनीवर विश्वास बसतो. पण नंतर आपण जसे जसे त्या कंपनीसाठी काम करु लागतो तसे आपले पैसे त्यांच्याकडे जमा होतात पण आपल्याला वेळेवर पैसे दिले जात नाहीत. बरेच महिने काम केल्यानंतर आपण त्यांच्याकडे आपण सुरुवातीला नाव नोंदणीसाठी भरलेले पैसे तेवढे पैसे आपण कमवितो. तेव्हा आपल्या लक्षात येते की इतके महिने काम केले आणि शेवटी आपण आपणच भरलेले पैसे त्या कंपनीकडून कमविले. म्हणजेच इतके महिने आपण अप्रत्यक्षरित्या त्या कंपनीसाठी मोफत काम केले होते.
सर्वच नाही पण वर सांगितल्याप्रमाणे १०० पैकी ९५ कंपन्या कामाच्या नावाखाली आपल्या लुटणार्‍या असतात. याचा अर्थ काही मोजक्या का होईना काम देवून पैसे देणार्‍या कंपन्यादेखिल आहेत. पण असे असले तरी एखाद्या कंपनीचे काम करण्यापूर्वी त्या कंपनीची चांगली चौकशी करुनच काम करायला सुरुवात करा.

No comments:

Post a Comment