Monday, 13 January 2014

ऑनलाईन बँकिंग म्हणजे काय?

ऑनलाईन बँकिंग म्हणजे काय?
 बँकेचे अथवा पैशांचे व्यवहार इंटरनेटद्वारे करणे म्हणजेच ऑनलाईन बँकिंग. आपण असे इंटरनेटद्वारे ऑनलाईन बँकिंग आपल्या घरामधून, ऑफिसमधून अथवा जगातून कुठूनही करु शकता. काही वर्षांपूर्वी फक्त मोठ्या आंतरराष्ट्रीय (International) बँकेद्वारे दिली जाणारी ही ऑनलाईन बँकिंग सेवा आता जवळजवळ सर्वच लहानमोठ्या बँकेद्वारे दिली जाते.
सर्वसाधारणपणे प्रत्यक्ष बँकेमध्ये जाऊन होणारी जवळजवळ सर्वच कामे सध्या ऑनलाईन बँकिंगद्वारे शक्य झाली आहेत. जसे आपले खात्याची माहिती घेणे, शिल्लक रक्कमेची चौकशी, बिल भरणा, पैसे दुसऱ्यांना पाठविणे, पेमेंट थांबविणे, तसेच ऑनलाईन कर्ज (लोन) अथवा क्रेडीट कार्डाची मागणी करणे इ. त्यामूळे हे ऑनलाईन बँकिंग फार सोईचे होऊ लागले आहे.
टेलिफोनचे बिल, विजेचे बिल, गॅसचे बिल या छोट्या गोष्टी देखिल आता ऑनलाईन बँकिंगद्वारे सहज शक्य आहे. आपण घर बसल्या वेळीच सर्व बिले भरु शकता. तसेच यामध्ये असलेल्या ऑटो बिल पेमेंटद्वारे तर आपल्याला लक्षात ठेवून बिल भरण्याची देखिल गरज नाही, कारण महिन्याच्या बिलाची तारीख आली की वेळीच आपले बिल आपल्या बँक खात्यामधून भरले जाते आणि यासाठी आपल्याला कुठलेही अधिक पैसे द्यावे लागत नाहीत.
  
 ऑनलाईन बँकिंगचे फायदे
 
१.मोफत सेवा.
२.ऑनलाईन बँकिंगद्वारे आपण बँकेचे व्यवहार अथवा सर्व पैशांचे व्यवहार दिवसभरामध्ये म्हणजेच २४ तासांमध्ये कधीही करु शकतो. इथे आपली बँक चालू अथवा बंद असल्याने काहीच फरक पडत नाही.
३.वेळेमूळे काम अडून राहत नाही, कारण महिन्याभर २४ तास आणि ७ आठवडे म्हणजे दररोज हे शक्य आहे.
४.व्यवहार वेळीच आणि जलद होतो, कारण इथे रांगेची गरज नाही.
५.आपण एकाच वेळी आपले सर्व खाते हाताळू शकता आणि ते हि सहज पध्यतीने.
६.हे सुरक्षित असून आपल्या खात्याची योग्य काळजी बँकेद्वारे घेतली जाते.
७.बर्‍याच बँका आता त्यांच्या ऑनलाईन बँकिंग सेवेद्वारे विम्याची (Life Insurance) सेवा देखिल देतात.
  
 ऑनलाईन बँकिंगचे तोटे
 
१.आपल्याला आपला ऑनलाईन बँकिंगचा इंटरनेटवर वापरायचा युजरआयडी आणि पासवर्ड सुरक्षित ठेवावा लागतो. कारण आपल्या बँक खात्याच्या युजरआयडी आणि पासवर्डद्वारे कुणीही आपल्या खात्याचा गैरवापर करु शकतो.
२.काही बँकेची ऑनलाईन बँकिंगची सेवा फार क्लिष्ट असल्याने मग ग्राहकांना ऑनलाईन बँकिंग वापरण्या एवजी प्रत्यक्ष बँकेत जाणे योग्य वाटते.
 प्रत्यक्षात पाहता ऑनलाईन बँकिंगचे तोटे फारच शुल्लक असल्याने ऑनलाईन बँकिंग खरंतर आपल्यासाठी फायदेशीर असल्याचे दिसून येते. ऑनलाईन बँकिंगविषयी अधिक माहिती त्या-त्या बँकेमध्ये मोफत दिली जाते. तसेच ही सेवा अगदी मोफत असते. तर बऱ्याच बँका आता जर त्यांच्या एखाद्या ऑनलाईन बँकिंग खात्याचा गैरवापर झाल्यास त्याची जबाबदारी स्विकारतात.

No comments:

Post a Comment