Monday, 13 January 2014

गूगल प्लेसेस - आपल्या व्यवसायाची माहिती इंटरनेटवर


गूगल प्लेसेस - आपल्या व्यवसायाची माहिती इंटरनेटवर
 'गूगल प्लेसेस' हा गूगलचा लहान-मोठ्या व्यवसाय करणार्‍यासाठी चांगला उपक्रम आहे. आपण आपल्या कोणत्याही व्यवसायाची माहिती इथे देऊ शकता म्हणजेच आपली जाहिरात गूगलवर करु शकता महत्वाचे म्हणजे हे सारे मोफत आहे.
आपण आपल्या कोणत्याही व्यवसायाची माहिती इथे देऊ शकता याचे चांगले उदाहरण म्हणजे माझेच घ्या ना. गूगल.कॉम हे संकेतस्थळ चालू करा आणि त्यामध्ये ' website developer in prabhadevi '  असे शोधा. बहूदा दुसर्‍या-तिसर्‍या क्रमांकावर आपल्याला माझ्या वेबसाइट बनविण्याच्या व्यवसायाची माहिती पाहता येईल. आता इथे माझे संकेतस्थळ असल्याने तिथे ते दिले होते पण जर आपल्या व्यवसायाचे संकेतस्थळ नसल्यास त्या एवजी गूगल मॅपद्वारे (नकाशा) आपल्या जागेचे ठिकाण देऊ शकता.
'गूगल प्लेसेस' वर आपल्या व्यवसायाची माहिती ठेवण्यासाठी तसे आपल्याला फार कष्ट घ्यावे लागणार नाही. बस्सwww.google.com/places/   चालू करा. आपल्या गूगलच्या जीमेलने 'साईन-इन' करा. " List your business " या बटणावर क्लिक करा आणि आपली माहिती भरा. इथे अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या व्यवसायाची माहिती इथे दिल्या नंतर आपण भरलेली माहिती योग्य आणि खरी आहे पडताळण्यासाठी 'गूगल प्लेसेस' खास तसदी घेऊन आपल्याला पोस्टाने एक क्रमांक आणि माहिती कायम करण्याची माहिती असलेले (Unique Personal Identification Number and Activation Instructions) पत्र पाठविते. हे पत्र आपल्याला एका आठवड्यामध्ये आपण दिलेल्या व्यवसायाच्या पत्त्यावर येते त्यातील माहिती मग परत इथेच ' गूगल प्लेसेस ' च्या संकेतस्थळावर दिल्यानंतर आपली जाहिरात कायम होते.
भविष्यामध्ये मग 'गूगल प्लेसेस' लोकांच्या माहिती शोधण्यानुसार आपली जाहिरात दाखवितो. जसे वर दिल्याप्रमाणे आपण गूगल.कॉम वर ' website developer in prabhadevi '  असे शोधल्यास आपल्याला माझ्या व्यवसायाची माहिती दिसेल. इथे जर कालांतराने 'गूगल प्लेसेस' वर नविन जाहिराती आल्यानंतर आपली माहिती नंतर खाली सरकू लागते पण जर आपल्याला सदैव आपली जाहिरात वर ठेवायची असल्यास थोडा विचार करा उत्तर लगेच सापडेल.
शेवटी सांगायचे इतकेच की हे ' गूगल प्लेसेस '  मोफत कधी पर्यंत राहिल देव जाणे पण आत्तापर्यंत तरी गूगलने मोफत सुरु केलेल्या सर्व सेवा देवाच्या कृपेने मोफतच सुरु आहेत. त्यामूळे लगेचच आपल्या व्यवसायाची माहिती इथे ठेवा आणि इंटरनेटच्या माध्यमातून आपल्या संभाव्य ग्राहकाला शोधा.

No comments:

Post a Comment